पालिका निवडणुकीआधी भाजपाच्या शिलेदारांमध्ये शाब्दिक युद्ध; मंदा म्हात्रे-गणेश नाईक आमने-सामने

151

पालिका निवडणुकीआधीच भाजपाच्या शिलेदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगू लागले असून, नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक पुन्हा आमनेसामने आले आहेत. शासकीय रुग्णालयाच्या भूखंडावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे.

(हेही वाचा- सिडकोकडून सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट! 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा, या तारखेपासून नोंदणी सुरू होणार)

भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बऱ्याच प्रयत्नांती आपल्या मतदारसंघात शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळवली आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत सिडकोकडून भूखंड खरेदी करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. परंतु, शासकीय रुग्णालयासाठी भूखंड मोफतच मिळावा, असा गणेश नाईक यांचा अट्टाहास आहे. परंतु, सिडकोकडून अशाप्रकारे मोफत भूखंड उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने मंजूर रुग्णालय हातातून निसटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी नाईकांच्या भूमिकेला जोरदार विरोध सुरू केला आहे.

तुमच्या चेहऱ्यावरचा बुरखा टराटरा फाडीन!

नवी मुंबईत शासकीय रुग्णालयासाठी मंजूर झालेला भूखंड मिळू नये, यासाठी अनेकांनी जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. हे रुग्णालय नवी मुंबईकरांची गरज आहे. तिथे फक्त माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर उपचार होणार नाहीत. त्याचा फायदा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे याद राखा, या रुग्णालयाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या चेहऱ्यावर चढवलेला समाजसेवेचा बुरखा टराटरा फाडीन, असा हल्ला म्हात्रे यांनी नाईकांवर चढवला आहे.

सत्तेत असताना झोपला होता का?

रुग्णालयासाठी फुकट भूखंड द्या, अशी मागणी करणारे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा झोपले होते का? तेव्हा का नाही घेतले फुकट भूखंड? महापालिका तेव्हाही भूखंडाची रक्कम सिडकोला देत होती, आजही देत आहे. शासनाकडे पाठपुरावा करून या भूखंडाची निम्मी रक्कम मी माफ करून आणली आहे, असेही मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.