MLA Oath Ceremony : विधानसभेत १७३ आमदारांनी घेतली शपथ

83
MLA Oath Ceremony : विधानसभेत १७३ आमदारांनी घेतली शपथ
  • प्रतिनिधी

पंधराव्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या तीन विशेष अधिवेशनात शनिवारी (७ डिसेंबर) १७३ आमदारांनी भारतीय संविधानाची एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. तर मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या आमदारांनी शनिवारी शपथ घेण्यास नकार दिला. त्यामुळे नव्याने सत्ताग्रहण केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ठिणगी पडली. महाविकास आघाडीचे आमदार रविवारी (८ डिसेंबर) शपथ घेणार आहेत. (MLA Oath Ceremony)

शनिवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी महायुतीचे आमदार प्रचंड उत्साहात होते. शिवसेनेचे आमदार भगवा फेटा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार गुलाबी फेटा घालून विधानसभा सभागृहात दाखल झाले. शनिवारी सकाळी ११ वाजता हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी स्थान ग्रहण करताच राष्ट्रगीत आणि राज्यगीताने अधिवेशनाला सुरुवात झाली. कोळंबकर यांनी राज्यपालांकडून आलेला आदेश वाचून दाखवल्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. (MLA Oath Ceremony)

(हेही वाचा – MLA Oath Taking Ceremony : आणि जागा चुकलेल्या कसब्याच्या आमदारांना अजितदादा घेऊन आले…)

सुरुवातीला कोळंबकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून भाजपाचे चैनसुख संचेती, जयकुमार रावल, शिवसेनेचे आशीष जयस्वाल, अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांची निवड जाहीर केली. त्यामुळे या चार जणांना सर्वप्रथम विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. या चौघांनी मराठीतून शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. (MLA Oath Ceremony)

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी शपथ न घेता महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाबाहेर पडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शपथविधीसाठी सहकुटुंब आलेल्या काही काँग्रेस आमदारांचा हिरमोड झाला. (MLA Oath Ceremony)

(हेही वाचा – Malegaon Vote Jihad प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी; किरीट सोमय्यांनी दिली माहिती)

वळसे पाटील यांच्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, बबनराव लोणीकर, संजय कुटे, सुरेश खाडे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, उदय सामंत, धर्मरावबाबा आत्राम, संभाजी पाटील निलंगेकर, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण, राजकुमार बडोले, आशीष शेलार, अतुल सावे, चंद्रकांतदादा पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ, सुलभा खोडके, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे, मोनिका राजळे यांच्यासह १७३ जणांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सदस्यांनी नोंदवहीत सही करून हंगामी अध्यक्षांशी हस्तांदोलन करत सभागृहात स्थानापन्न झाले. (MLA Oath Ceremony)

भाजपच्या गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नितेश राणे, प्रताप अडसड, राम कदम यांनी संस्कृतमधून, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, एमआयएमच्या मुफ्ती महम्मद इस्माईल यांनी हिंदीतून तर भाजपाच्या कुमार आयलानी यांनी सिंधीतून शपथ घेतली. समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांच्यासह सर्व सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. काही आमदारांनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे आवर्जून स्मरण केले. (MLA Oath Ceremony)

(हेही वाचा – Assembly ची पहिल्यांदा पायरी चढणारे नवे आमदार नक्की आहेत तरी कोण ? जाणून घ्या एका क्लिकवर…)

… आणि हेमंत रासने विरोधी बाकावर बसले!

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे हेमंत रासने आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळले. सभागृहात सत्ताधारी बाकावर बसण्याऐवजी ते विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर रासने यांना हाताला धरून उठवले आणि सत्ताधारी बाकावर बसवले. (MLA Oath Ceremony)

अबू आझमी, निकोले यांनी घेतली शपथ

ईव्हीएमच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार दिला. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी, रईस शेख आणि माकपच्या विनोद निकोल यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आघाडीत समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा विधानभवनात होती. मात्र, अबू आझमी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपण महविकास आघाडीपासून दूर गेलो नसल्याचे स्पष्ट केले. (MLA Oath Ceremony)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.