शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात उल्लेख असून, ५ डिसेंबरला त्यांना अलिबाग कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत वावड्या उठल्या होत्या मात्र साळवी यांनी कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. तर आता साळवींना एसीबीने नोटीस बजावल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! EPFO पेन्शन आणि सॅलरीबाबत मोदी सरकारनं घेतला निर्णय)
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बजावलेल्या नोटीशीबाबत प्रतिक्रिया देताना थेट राज्यकर्त्यांनाच ललकारले. मला चौकशीची नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मी निर्दोष, स्वच्छ आहे. माझ्या जनतेलाही माहित आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, असे राजन साळवी म्हणाले.
‘हो मी श्रीमंत आहे…’
पुढे ते असेही म्हणाले की, हिंमत असेल तर मला तुरूंगात टाका, माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा. मी घाबरत नाही. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जनतेसह उद्धव ठाकरे आणि शिवसेनाही माझ्या पाठिशी आहेत. तुरूंगात जाईल पण मी शरण जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर साळवी आक्रमक होत म्हणाले, हो मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती ही बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर मारलेली थाप आहे. माझे शिवसैनिक ही माझी संपत्ती, श्रीमंती आहे. वडापाव खाऊन आम्ही जिल्ह्यातील शिवसेना वाढवली ही चूक केली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अनेक वर्षांपासून मी राजकारणात आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे, असे लोकं भाजपमध्ये गेल्यावर ताबडतोब निर्दोष होतात. अशी कित्येक उदाहरणे आहेत. आता मला नोटीस दिली. माझ्या संपत्तीची आणि मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश हळूहळू काढण्यात येतील, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community