आमदार रवी राणा शनिवारी (ता. २३) मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. राणांसोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असतील, असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यावरील साडेसाती घालविण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे, नाहीतर आम्ही स्वतः मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता.
(हेही वाचा – Netflix ठरला कोणत्या व्हायरसचा बळी? १०० दिवसांत गमावले २ लाख सबस्क्रायबर्स)
…आणि मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू
रवी राणा म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले होते की, ते जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जेथून राज्याला विचार दिले, ते मातोश्री शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान आहे. त्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा. पण हनुमान जयंतीच्या पर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिका पठण केले नाही. त्यामुळे २२ एप्रिलला आम्ही निघणार आहोत आणि मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत.
आज जर बाळासाहेब असते तर…
कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करू, असे आमदार राणा यांनी म्हटले आहे. रवी राणा पुढे म्हणाले, आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी मातोश्रीसमोर बसून हनुमान चालिसा पठण करण्यास सन्मानाने परवानगी दिली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हनुमान चालिसा पठणाला विरोध करून महाराष्ट्राला कोणता संदेश देत आहेत? हनुमान चालिसा वाचण्यासाठी त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल? ज्या हिंदूंच्या नावावर आपण मतं जमा करतो, सत्तेवर येतो, मुख्यमंत्री बनतो, तिथे हनुमान चालिसाचा इतका विरोध का? आज महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे, शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, विकासाची कामं थांबली आहेत. मुख्यमंत्री दोन दोन वर्ष मंत्रालयात जात नाहीत. कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर मुख्यमंत्री पोचत नाहीत, अशा प्रकारचं ग्रहण मुक्त करण्यासाठी आम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
रवी राणा विरुद्ध शिवसेना सामना पुन्हा रंगणार
आमदार रवी राणा हे पोकळ धमक्या देत आहे, रवी राणा यांच्यासाठी मातोश्री दूर आहे. त्यांना अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर पाय ठेवू देणार नाही, रेल्वे स्टेशनवर २२ एप्रिल रोजी शिवसैनिक देखील तयार राहतील, असा इशारा शिवसेनेचे पराग गुडधे यांनी दिला. त्यामुळे आता अमरावतीत रवी राणा विरुद्ध शिवसेना सामना पुन्हा रंगणार आहे. यात शंका नाही मात्र या राजकारण्यांच्या भांडनापाई शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले असल्याने सामान्य नागरिक मात्र चांगलेच चिंतेत पडले आहेत.
Join Our WhatsApp Community