मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदेशीर संपत्ती; ‘हा’ आमदार करणार ईडीकडे तक्रार

ईडी आणि सीबीआयकडे पुरावे सादर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत, असे या आमदाराने म्हटले आहे.

83

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्याबाबत त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीही सुरू आहे. पण आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विदेशात बेकायदेशीर संपत्ती असल्याचा आरोप एका आमदाराने केला आहे. त्याबाबत आपण केंद्रीय तपास यंत्रणांकडे त्याची तक्रारही करणार असल्याचे या आमदाराने सांगितले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आजवर अनेकदा महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आगपखड केली आहे. पण खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर, राणा दाम्पत्य आता चांगलेच आक्रमक झाले आहे. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले रवी राणा?

काही वर्षांपूर्वी अमरावती लोकसभा लढण्याचा निर्णय जेव्हा नवनीत राणा यांनी घेतला, तेव्हा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्यावर अनेकदा आरोप केले. अनुसूचीत जाती-जमाती आयोगाकडे त्यांनी नवनीत राणा यांची तक्रार केली, 2013 साली त्यांनी नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली. पण या दोन्ही वेळी नवनीत राणा जिंकल्या. यानंतरही जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा फार मोठा धक्का होता. त्यमुळे आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता, त्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत, नवनीत राणा यांना न्याय मिळवून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही 200हून अधिक कागदपत्रे सादर करणार असल्याचे, आमदार रवी राणा यांनी सांगितले.

(हेही वाचाः आता आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती)

मुख्यमंत्र्यांची करणार तक्रार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तेक्षप करुन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यामार्फत मला आणि खासदार नवनीत राणा यांना टार्गेट केल्याचा गंभीर आरोप, रवी राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे त्वेषाचं राजकारण करत आहेत. मी उद्धव ठाकरेंच्या विदेशातील सर्व अवैध संपत्तीची माहिती मिळवली आहे. विदेशातील त्यांची घरे, हॉटेल्स आणि जमिनींची सर्व माहिती आपल्याकडे असून, त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत. ईडी आणि सीबीआयकडे हे पुरावे सादर करुन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत, असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टबाबतही त्यांच्यावर कारवाईची मागणी आपण करणार आहोत, असे रवी राणा यांनी सांगितले.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

मी ज्यावेळी राजकारणात येण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मी महाराष्ट्राची नाही असे आरोप करुन, मला राजकारणापासून दूर ठेवण्याचे काम शिवसेनेने केले आहेत. 2014च्या निवडणुकांच्या वेळी आठ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन आपण पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावणं, समितींच्या चौकशीला सामोरे जाणं, मग उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालय असा संघर्ष आपण केला आहे. या सगळ्या गोष्टी लोकांच्या हितासाठी आवाज उठवणा-या एका महिलेचा आवाज दाबण्यासाठी करण्यात आल्या, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. माझ्या विरोधकांना आता पराभव सहन होत नसल्यामुळे ते माझ्याविरुद्ध हे षडयंत्र रचत आहेत. पण त्यांचा पराभव मी नाही, तर अमरावतीच्या जनतेने केला आहे, जनतेने त्यांना नकार दिला आहे. 2019 मध्ये मी वैधरित्या जिंकून आले. या दोन वर्षांत मी जनतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध कायम आवाज उठवला. आणि म्हणूनच मला त्रास देण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

(हेही वाचाः अखेर महाविकास आघाडीचे ठरले! नाराजी दूर करण्यासाठी हा काढला मार्ग!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.