नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली असून मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेत जाणार असल्याचे सांगितले आहे. ”शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत”, मात्र या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत आमदार सरोज अहिरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी अजित दादांसोबत असल्याचे स्पष्ट करत नाशिक जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा – ‘मोदींसारखा दुसरा नेता देशात नाही’; अजित पवार यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक)
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. यानंतर ज्येष्ठ नेत्यांसह अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. असं असलं तरी काही आमदार तटस्थ भूमिकेत होते. यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर कुणाला पाठिंबा देणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सरोज अहिरे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित रहात त्यांना पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान सरोज अहिरे म्हणाल्या, “माझी तब्येत खराब होती, मात्र आता बरं वाटतं आहे. मी आज अजित पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले आहे. याचा अर्थ असाच आहे की, मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे. हॉस्पिटलमध्ये असताना माझ फोनद्वारे सर्वांशी चर्चा झाली आहे. सगळ्यांचं एकच मत होतं आणि ते म्हणजे आपण विकासाबरोबर जायला हवं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community