राज्यातील नाट्यमय सत्तांतरणाच्या आधी चर्चा एकनाथ शिंदे गटातील आमदार गुवाहटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले होते. त्यावेळी शिंदे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या एका फोन कॉलची चांगलीच चर्चा झाली होती. काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, ओक्के मध्ये हाय एकदम हा शहाजी बापूंचा डायलॉग पिक्चरमधल्या डायलॉगपेक्षाही हिट झाला. त्यामुळे शहाजी बापू हे रातोरात सेलिब्रिटी झाले.
नुकतीच हवा येऊ द्या या कार्यक्रमात शहाजी बापू आणि त्यांच्या पत्नी रेखा यांनी हजेरी लावली. त्यावेळी रेखा यांनी शहाजी बापू आणि त्यांच्या लग्नाच्या वेळी घडलेला एक किस्सा सांगितला आणि शहाजी बापूंचे पितळ उघडे पडले.
दागिने झाले पितळेचे
शहाजी बापूंनी व्हायरल झालेल्या आपल्या सुप्रसिद्ध फोन कॉलमध्ये आपल्या बायकोला लुगडं देखील देता आलं नसल्याची खंत बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांच्या साधेपणाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. पण याच शहाजी बापूंनी लग्नात आपल्या बायकोच्या अंगावर पितळेचे दागिने घातल्याचा गौप्यस्फोट त्यांच्या पत्नी रेखा यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला. त्यावेळी नेमकं काय झालं होतं याबाबतचा किस्सा देखील शहाजी बापू यांनी सांगितला.
कमी पैशात करायचे होते लग्न
आम्ही तिन्ही भावांनी मिळून एक हजार रुपयांत लग्न करायचे ठरवले होते. त्यावेळी सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर 750 रुपये तोळा सोनं होतं. ते काही आम्हाला परवडणारं नव्हतं. पण तो सोनार माझा मित्र होता. त्याने मला 200 रुपयांचं सोनं आणि बाकी पितळ मिक्स करुन दागिने बनवून देतो असे सांगितले.
पण जेव्हा माझी पत्नी सात-आठ महिन्यांनी ते दागिने मोडायला गेली तेव्हा तिच्या हा प्रकार लक्षात आला. नंतर ती माझ्याशी भांडायला आली तेव्हा मी तिची माफी मागितली, असं शहाजी बापू यांनी सांगितले. या भन्नाट किस्स्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या जोडीदारासोबत उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community