प्रतिनिधी – सुहास शेलार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शहरापासून गावापर्यंत चौकाचौकांत, नाक्या-नाक्यांवर, गल्लीबोळात राष्ट्रवादीतील फुटीविषयीच्या चर्चा चवीचवीने चघळल्या जात आहेत. परंतु, या चर्चा केवळ लक्ष विचलित करण्यासाठी असून, खरी फूट कॉंग्रेसमध्ये पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील; त्यानंतर अजित पवार ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशा चर्चा गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील काही मंत्री, आमदार त्यास दुजोरा देत आहेत. राष्ट्रवादीचे दोन-तीन आमदार तर गुडग्याला बाशिंग बांधून तयारही झाले आहेत. त्यामुळे उद्विग्न झालेल्या अजित पवारांनी नुकतीच माध्यमांसमोर सफाई दिली. तरीही या चर्चा थांबलेल्या नाहीत.
त्यामुळे ‘हिंदुस्थान पोस्ट’ने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या गोटात याचा कानोसा घेतला असता, खळबळजनक माहिती समोर आली. त्यानुसार, अजित पवारांच्या नावे जाणिवपूर्वक वावड्या उठवल्या जात असून, त्याआडून पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरू आहेत. कॉंग्रेसमधील १६ आमदारांचा गट भाजपामध्ये येण्यासाठी राजी झाला आहे. त्याचे नेतृत्त्व खुद्द अशोक चव्हाण करीत असून, त्याकडे लक्ष जाऊ नये, यासाठी अजित पवारांविषयीच्या चर्चांना बळ दिले जात आहे.
पडद्यामागे काय सुरू?
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसमधील काही आमदार भाजपामध्ये येण्यासाठी अनुकूल आहेत. त्याविषयीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
- यात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विश्वजीत कदम, धीरज देशमुख, अमर राजूरकर, संग्राम थोपटे यांच्यासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांचा समावेश आहे.
- भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवसेना एकत्र लढली, तर लोकसभेला शिवसेना-भाजपा युतीला ३० हून अधिक जागा मिळणार नाहीत. शिवाय एकट्या शिंदेंच्या भरवशावर विधानसभेला पूर्ण बहुमत मिळणे आजमितीला तरी शक्य नाही.
- त्यामुळेच महाविकास आघाडीला सुरुंग लावत कॉंग्रेसमधील एक गट फोडला, तर विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या होतील, अशी रणनीती भाजपाकडून आखली जात आहे.