मंगळवारी पहाटे मुंबईत झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावरही झालेला पहायला मिळाला. अनेक आमदार, मंत्र्यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे अर्धा तास चर्चा पुढे ढकलत त्याजागी लक्षवेधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
( हेही वाचा : अवकाळी पावसामुळे मुंबईकरांचा खोळंबा! लोकल ट्रेन विलंबाने, तर वाहतूक संथ गतीने )
मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे नोकरदारांना जसा कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला, तसाच आमदार आणि मंत्र्यांनाही झाला. मुंबईत सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून विधानसभेचे कामकाज सुरू होणार होते. मात्र, अनेक आमदार, विरोधीपक्ष नेते आणि मंत्री वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ते वेळेत पोहचू शकले नाहीत.
परिणामी कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार ठरलेली अर्धा तास चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत निवेदन करताना तालिका अध्यक्ष सुनील भुसारा म्हणाले, मुंबईत प्रचंड पाऊस झाल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे अनेक आमदारांचे फोन आले की, ते वेळेत पोहचू शकणार नाहीत. त्यांच्या विनंतीवरून अर्धा तास चर्चा पुढे ढकलून त्याजागी लक्षवेधी सुरू करण्यात येत आहे.
सभागृहात किती मंत्री होते?
अवकाळी पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक मंत्री वेळेत सभागृहात पोहचू शकले नाहीत. मंगळवारी विधानसभेच्या सकाळच्या सत्रात दीपक केसरकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार, चंद्रकांत पाटील इतकेच मंत्री उपस्थित होते. शिवाय सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचे बाकही बऱ्यापैकी रिकामे होते.
Join Our WhatsApp Community