सरकार टिकवण्यासाठी राऊतांकडून शिवसेनेचे नुकसान- दरेकर

संजय राऊत शिवसेनेचं किती नुकसान करणार आहेत, हे येणाऱ्या काळात समजेल.

93

शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या शक्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु कोल्हापूरचे पैलवान गडी हसन मुश्रीफ यांच्या बाहूंत किती बळ आहे हे सांगण्यातच सध्या राऊत व्यस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस बद्दल एवढं आंधळं प्रेम संजय राऊत दाखवत आहेत. पवार यांच्याबद्दल निष्ठा व्यक्त करतानाच, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी संजय राऊत शिवसेनेचं किती नुकसान करणार आहेत, हे येणाऱ्या काळात समजेल, अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

शिवसेनेचे काही होवो, पण सरकार टिकले पाहिजे

सामना अग्रलेखातून टीका करताना महाविकास आघाडी सरकारमध्ये सद्यःस्थिती काय आहे, याचं भान राऊत यांना नाही. त्यांचा फक्त एकतर्फी कार्यक्रम सुरू आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यामुळे आघाडी सरकार आलं आहे, त्यामुळे शिवसेनेचे काहीही होऊ दे. परंतु ५ वर्ष हे सरकार टिकलं पाहिजे यासाठी केवळ राऊत यांची धावपळ सुरू असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.

(हेही पहाः शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जुंपले शाब्दिक ‘युद्ध’)

राऊत हे का विसरतात?

ईडी, सीबीआय यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचे सांगताना राज्यात आघाडी सरकारमध्येही तपास यंत्रणांचा कसा गैरवापर चालला आहे, हे राऊत सांगायला विसरत आहेत का?, असा सवाल दरेकरांनी केला आहे. राणे यांना तातडीने अटक करण्यात आली, किरीट सोमय्या यांना कारण नसतानाही ६ तास नजरकैदेत ठेवलं, एका लहान मुलीने केवळ उद्धव ठाकरे यांचे मीम्स फॉरवर्ड केले म्हणून तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणावातचे ऑफिस घाईघाईत पाडण्यात आले. मग त्यामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला नाही का?

धमक्यांची चौकशी नाही

अतुल भातखळकर, चित्रा वाघ,  किरीट सोमय्या यांना धमक्यांचे फोन आल्यानंतरही त्याची साधी चौकशी सुद्धा झालेली नाही. त्यांची तुम्हाला काळजी नाही का? ज्येष्ठ गायिका लता दिदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरची चौकशी करावी, ही भाषा महाविकास आघाडी सरकारचीच होती. या सगळ्या गोष्टींचा सोयीस्कर विसर राऊत यांना पडला आहे का, असा सवालही दरेकर यांनी केला.

(हेही वाचाः गीतेंचे ‘ते’ विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार! तटकरेंचा संताप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.