मिठी नदीवरील महापालिकेचे अर्धवट काम एमएमआरडीए करणार पूर्ण

या पुलाच्या ठिकाणी एमएमआरडीएची कामे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे अर्धवट काम करुन घेतले जात आहे.

129

कुर्ला पश्चिमेच्या सीएसटी रस्त्यावरील मिठी नदीच्या पुलाचे रुंदीकरण व पुनर्बांधणीचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. आधीच हे काम एक वर्ष विलंबाने कंत्राटदाराने सुरू केले नाही. त्यातच याठिकाणी एमएमआरडीएने सुरू केलेल्या कामाची प्रगती राखता येत नसल्याने महापालिकेने या अर्धवट पुलाच्या बांधकामाची जबाबदारी एमएमआरडीएवरच सोपवली आहे. परंतु याला स्थायी समितीने विरेाध दर्शवला असून, हे काम महापालिकेच्या निष्णात अभियंत्यांकडूनच करुन घेण्याची मागणी केली आहे. परंतु महापालिकेने हे काम एमएमआरडीएला आधीच सोपवले असून, त्यांनी या कामालाही सुरुवात केल्याने समितीचा विरोध का फक्त कागदावरच राहणार असल्याचे दिसून येते.

कंत्राटदाराकडून दिरंगाई

कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या पुलाच्या बांधकामासाठी वालेचा इंजिनिअरींग कंपनीला सुमारे ६० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाच्या कामाला ६ जानेवारी २०१८ पासून सुरुवात झाली. या पुलाचे बांधकाम नियमानुसार मे २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण हे काम एक वर्ष विलंबाने सुरू केल्याने याचा कालावधी मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु नियोजित वेळेत कंत्राटदाराने हे काम पूर्ण न केल्याने, येथील एमएमआरडीएच्या कामांमध्ये प्रचंड अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कंत्राटदाराचे काम रद्द करुन उर्वरित काम महापालिकेने एमएमआरडीएकडून पूर्ण करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित कामे एमएमआरडीएला हस्तांतरित करुन, ५१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी फेब्रुवारी २०२१ला देण्यात आला.

(हेही वाचाः दादरच्या कासारवाडी आणि प्रभादेवीतील सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास रखडणार)

प्रभाकर शिंदे यांची सूचना

पुलाचे कंत्राट रद्द करून उर्वरित काम एमएमआरडीएकडून करुन घेण्याचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी काम पूर्ण केले नाही म्हणून कंत्राटदारावर काय कारवाई केली, याची विचारणा प्रशासनाकडे केली. जर ५१.८१ कोटी रुपये एमएमआरडीएला देण्यात येत आहेत, तर कंत्राटदाराने किती काम केले आहे याची माहिती कुठेच नाही. आणि हे काम एमएमआरडीएला देण्याऐवजी महापालिकेने स्वत: करावे, अशी सूचना केली.

महापालिकेचे अभियंते सक्षम

भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी या प्रस्तावात अक्षम्य अशा चुका आहेत, काम अर्धवट करणाऱ्या कंत्राटदाराला किती अधिदान झाले, याची माहिती नाही असे सांगितले. याचे अर्धवट काम सोडणारा कंत्राटदार उद्या एमएमआरडीएकडून काम मिळवेल. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करुन यासाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करुन काम करावे, अशी मागणी शिरसाट यांनी केली. या कामासाठी महापालिका सक्षम असून ते महापालिकेचे अभियंते चांगल्याप्रकारे करू शकतील. यासाठी एमएमआरडीएकडून करुन घेण्याची गरज नाही, असे सांगितले.

(हेही वाचाः उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने उपसल्या विरोधाच्या तलवारी! शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा)

याबाबत उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे काम यापूर्वीच एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या पुलाच्या ठिकाणी एमएमआरडीएची कामे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे अर्धवट काम करुन घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.