मेट्रो रेल्वे ६ मार्गातील ‘त्या’ उड्डाणपुलाचे बांधकाम करणार एमएमआरडीए, पण पैसा मात्र महापालिकेचा

पश्चिम उपनगरातील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी कॉरिडोरमधील लिंक रोड ते पुनम नगर या उड्डाणपुलाचे बांधकाम मेट्रो लाईन-६ ला बाधित होत असल्याने या उड्डाणपुलाचे बांधकाम आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार असून मेट्रोचे काम सुरु असलेल्या कंत्राटदाराकडूनच एमएमआरडीए काम करून घेणार असल्याने मेट्रोच्या कंत्राटदाराला आता डबल लॉटरी लागणार आहे.

महापालिका ३८४ कोटी रुपयांची रक्कम देणार

मेट्रो लाईन-६ या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी कॉरिडोरची बांधकाम करताना पश्चिम उपनगरातील लिंक रोड ते पुनम नगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचा अडथळा येत असून या पुलाचे बांधकाम मेट्रोच्या कामाबरोबरच करणे आवश्यक असल्याने महापालिकेने एमएमआरडीएशी चर्चा करून त्यांच्या मार्फतच या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने त्यातील ५० टक्के बांधकामाचा खर्च एमएमआरडीएला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएला महापालिका ३८४ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांनी दिली आहे.

(हेही वाचा Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी झालीच तर कोरोनाबाधित अजित पवार आणि भुजबळ काय करणार?)

पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक 

मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने त्यांच्या माध्यमातूनच हे काम करून घेण्यासाठी त्यांना या पुलाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पुलाचे काम या मेट्रो ६च्या कॅरीडोअरच्या बांधकामाबरोबरच पुलाचेही बांधकाम केले जाणार आहे. मेट्रो मार्गाच्या खालून या पुलाचे बांधकाम केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आजवर या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली जात असली तरी एमएमआरडीएकडून या पुलाचे बांधकाम केले जाणार असल्याने आता मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या कंत्राटदराकडूनच हे काम करून घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here