लोकसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मनसेला दोन जागा देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते. यामध्ये अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर या दोघांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांनी जर लोकसभा निवडणूक लढविली तर ते आदित्य ठाकरे यांच्यानंतर निवडणूक लढविणारे ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य असणार आहेत.
(हेही वाचा Prakash Ambedkar : ठाकरे आणि पवार गटावरील विश्वास उडाला; प्रकाश आंबेडकरांची जाहीर नाराजी)
अमित ठाकरे यांच्याकडून महासंपर्क अभियान
राज ठाकरेंनी मला कुठलीही जबाबदारी दिली तर मी ती यशस्वी पार पाडेन. मला नगरसेवक, सरपंच पदासाठी जबाबदारी दिली तरी ती व्यवस्थित पार पाडेन, असे अमित ठाकरे यांनी पुण्यातील दौऱ्यात म्हटले होते. यापूर्वीचे मनसेचे (MNS) १३ आमदार आणि नाशिक हा बालेकिल्ला होता. मात्र, पक्षाच्या घसरणीनंतर मनसेपुढे राजकीय आव्हाने वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित ठाकरे यांनी नाशिक दौरा करत महासंपर्क अभियान राबविले. राज्यातील महासंपर्क अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. अरविंद सावंत हेच पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याकरिता भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतून मनसेचे बाळा नांदगावकर आणि आधीपासून ज्या नाशिकमध्ये मनसेचे वर्चस्व आहे, तेथून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी चर्चा आहे.
Join Our WhatsApp Community