वसईतील कोविड सुविधेबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध मनसेचे आंदोलन! 

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी वसईतील महापालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि आरोग्य सेवेतील  प्रशासकीय आधिकारी सर्वसामान्य जनतेची व्यथा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

88

वसई तालुक्यात सध्या आरोग्य व्यवस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. त्यामुळे याविरोधात मनसे ही तालुका प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. येत्या ५ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लसीसाठी वशिलेबाजी!

वसईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सर्वसामान्य जनतेला पुरविण्यात येणारी अपुरी आणि लुटारू आरोग्य सेवा यामुळे वसईत कोरोनामुळे अनेक निष्पाप जणांचे बळी जात आहेत. वसईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा, ती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, रात्री १२ वाजल्यापासून लोक रांगेत उभे राहतात यात दोन लोकांचा हकनाक बळी गेला. लसीकरण केंद्र वाढवली जात नाहीत. लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात चालणारी वशिलेबाजी, कोरोना लसीकरिता वसईकर जनतेला मुबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथे जावे लागते, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा : अखिल चित्रे कुणाला म्हणाले परिवार मंत्री?)

रेमडेसिवीरचा काळाबाजार!  

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड रुग्णालयांना रेमडेसिवीर पुरवले जाते, परंतु तरी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिवीर बाहेरून मागविण्याचा तगादा लावला जातो, रेमडेसिवीरच्या काळाबाजाराला जबाबदार कोण? खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णाची सुरू असलेली लूट, यावर प्रशासनाचे नसलेले नियंत्रण, हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली बेड संदर्भातील माहिती दर दोन तासांनी वेबसाईटवर अपडेट्स नसणे, त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलबाहेर रग्णवाहिकेतच ताटकळत राहावे लागते, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

कोविड सेंटर केवळ नावापुरती!

सर्वसामान्य जनतेसाठी उभारण्यात आलेली कोविड सेंटर केवळ आयसोलेशन वॉर्ड असून त्यात ना ऑक्सिजन बेड, ना व्हेंटिलेटर,  मग सर्व सामान्य जनतेने उपचार घ्यायचे कुठे? सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी वसईतील महापालिका आधिकारी आणि तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे महसूल आणि आरोग्य सेवेतील  प्रशासकीय आधिकारी सर्वसामान्य जनतेची व्यथा ऐकण्याच्या मनस्थितीत नसून मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करीत आहेत, असे दुर्दैवाने वास्तव आहे.  आम्हाला आरोग्य सेवा पुरवा, अशा प्रकारे एक ना अनेक प्रश्न आरोग्य सेवेबाबत वसईच्या जनतेला भेडसावत असून याबाबत बेजबाबदार राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, ५ मे २०२१ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तहसिल कार्यालयासमोर आवारात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.