मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या ठाण्यातील उत्तरसभेत टीकाकारांना सडेतोड उत्तरे दिली. पण त्यानंतर बुधवारी त्यांच्यावर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सभेदरम्यान मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांना तलवार दिली. त्यांनी ती तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन आता मनसेने राज्य सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
मनसेकडून एक खास व्हिडिओ तयार करण्यात आला असून, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे तलवारी उंचावलेले फोटो दाखवण्यात आले आहेत. जर राज ठाकरे यांच्यावर कारवाई होत असेल, ‘तर यांचं काय?’ असा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अजब तुझे सरकार उद्धवा… असं म्हणत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजब तुझे सरकार उद्धवा…
मनसेने दाखवलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे इतकंच नाही तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तलवार उंचावून दाखवल्याचे फोटो आहेत. ‘अजब तुझे सरकार उद्धवा…’ या गाण्यावर हे फोटो दाखवण्यात आले आहेत. उत्तरसभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग यांचं काय?, असा थेट सवाल करत मनसेकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार!! pic.twitter.com/OPeg27pNNW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 13, 2022
राज ठाकरेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल
शस्रास्त्र कायद्यांतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्याच्या गृह विभागाकडून सांगण्यात येत आहे. ठाण्यातील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी तलवार उंचावून दाखवल्यामुळे या कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका राज ठाकरेंवर ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच इतर 10 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.