राज्यात गेल्या आठवड्यांपासून राजकीय सत्तानाट्य सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सध्या राजकीय सत्ता संघर्षात अॅक्शन मोड आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी करत आहेत. अशातच त्यांनी मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघातील मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दौरे
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून अमित ठाकरे हे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दौरे करत असल्याचे दिसत आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे हे स्थानिक नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याचे सांगितले गेले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे २ आठवडे मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट रविवारी सोशल मीडियावर शेअर केली. यामध्ये त्यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आभार मानल्याचे देखील दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांनी आज मनविसेचे उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसंच मुंबईतील काही विधानसभा मतदासंघांतील मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. pic.twitter.com/6NgRsyEG4Y
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 27, 2022
काय होती अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट
“महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या दोन आठवड्यांत मी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गेलो. प्रत्येक ठिकाणी शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत होते. मनविसेत जबाबदारी स्वीकारून काम करायचं आहे असं आग्रहाने सांगत होते. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या या तरुणाईचा मी खरंच आभारी आहे.
मुंबईत हे संपर्क अभियान यशस्वी होण्यामागे फक्त आणि फक्त मनसेचे तसंच मनविसेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांची अपार मेहनत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानेच मनविसे ही सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनणार आहे. मनविसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”, असे अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले आहे.