महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. ठाण्यात प्रथमच मनसेचा वर्धापन दिन होत आहे. यानिमित्ताने गुरुवार, ९ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच हल्ला झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यामध्ये विविध कारणांमुळे धुसफुस सुरू आहे. या दोन्ही गटांसह भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. गेल्या तीन महिन्यांत राज ठाकरे यांनी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्ताने दोन दौरे केले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा ‘या’ राज्यांसाठी भाजपने ठरवले ‘Mission 160’)
Join Our WhatsApp Community