मनसेचे प्रमुख राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर मनसेकडून ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
बॅनरच्या माध्यमातून मनसेचे आवाहन
या बॅनरवर राज ठाकरे यांच्या भगवाधारी फोटो पाहायला मिळत असून त्यावर ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’, असाही उल्लेख बॅनरवर करण्यात आला असून ‘चला अयोध्येला, आम्ही चाललोय तुम्हीही चला,’ असेही बॅनरवर लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीतच मनसेकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनांही अयोध्येला येण्यासाठी बॅनरच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. मनसेकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीला शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी दिला ‘या’ पर्यायी जागेचा प्रस्ताव)
सेनेसाठी पर्याय बनण्याची मनसेकडून रणनीती
यापूर्वी महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणारे राज ठाकरे आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहेत. त्यामुळे आतापर्यंत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या शिवसेनेसाठी पर्याय बनण्याची रणनीती आखत असल्याचे म्हटले जात आहे. ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मनसेकडून १०-१२ रेल्वेची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत हजारो मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत. पण, हा राजकीय दौरा असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे हा दौरा करत असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.
Join Our WhatsApp Community