विमानतळला ‘दि.बां.’चे नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम! 

155

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई येथे सर्व पक्षीय आंदोलन सुरु आहे. त्यासाठी गुरुवार, २४ जून रोजी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी नवी मुंबईकडे कूच केले. सकाळपासून पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई या भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी नवी मुंबईकडे जमले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर, झेंडे घेऊन मोर्चे काढले असून ते आता सिडकोच्या कार्यालयाच्या बाहेर जमले  आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल ३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना, ‘विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावे’, असे निवेदन देण्यात आले. तसेच, १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि.बां.चे नाव नक्की करा अन्यथा १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम चालू देणार नाही, असा इशारा कृती समितीच्या व्यासपीठावरून आंदोलकांनी दिला.

तांडेल मैदानात आंदोलनकर्ते एकवटले!

माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, भूषण पाटील, मंदा म्हात्रे, दशरथ भगत यांचे शिष्टमंडळ सिडको भवनमध्ये गेले आणि त्यांनी सिडकोचे संचालक संजय मुखर्जी यांना निवेदन दिले. या आंदोलनासाठी विरार, पालघर, ठाणे, कल्याण, रायगड, पुणे, उरण, नवी मुंबई नवी मुंबईच्या तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमले. विरारहून बस, ऑटो, गाड्यांमधून झेंडे आणि फलक घेऊन कोळी-आग्री बांधव दाखल झाले. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव द्या, या मागणीसाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते एकवटले असल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले.

(हेही वाचा : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद पेटला! पनवेलकडे येणारे मार्ग बंद! )

महिलांनी आंदोलनस्थळीच वटपौर्णिमा केली! 

या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आले. हातामध्ये दि.बा. पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते सहभागी झाले. आंदोलनस्थळी दि.बा. पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. एल्गार स्टेजच्या शेजारीच महिलांनी वडाच्या झाडाला फेरे मारले. यावेळी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्याचे महिलांनी साकडे घातले.

मनसेचा पाठिंबा! 

नवी मुंबई पाम बीच रोडवर गाड्यांची ये-जा वाढली असून मुंबई, पालघर, विरार, ठाणे वसई या ठिकाणच्या गाड्या गणपतराव तांडेल मैदानाच्या दिशेने जाऊ लागल्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी पोहचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची भूमिका मांडल्यावर मनसे या आंदोलनात सहभागी होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र सिडकोने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेतला नाही, असे सांगत आमदार राजू पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

(हेही वाचा : पुण्याच्या आंबिल ओढा येथे स्थानिकांचा आक्रोश! काय आहे प्रकरण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.