मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादेत १ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांकडून अद्याप या सभेला अधिकृतपणे कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टांगती तलवार आहे. असे असतानाही सभेसाठी तयार व्हा आणि सभेच्या तयारीला लागा, असा आदेश मनसैनिकांना देणारे राज ठाकरेंच २९ तारखेला मुंबई सोडणार आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या सभेपूर्वी राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यानंतर ते औरंगाबादच्या सभेसाठी थेट पुण्यातून रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – औरंगाबादेत जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले पोलीस आयुक्त?)
औरंगाबादेत जमावबंदीचे आदेश नाही
मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. येत्या ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन पूर्ण झाले असून महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे, असे या बैठकीनंतर मनसैनिकांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, नेते देखील राज यांच्यासोबत औरंगाबादकडे निघणार आहेत. औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे, असे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते, मात्र औरंगाबादेत कोणतेही जमावबंदीचे आदेश नाही, असे स्पष्टीकरण औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिले.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
औरंगाबादमध्ये मंगळवारपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आले होते. हे वृत्त चुकीचे असल्याचे औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली. औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणे यावर आम्ही लक्ष ठेवत असतो, असे निखिल गुप्ता यांनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर सांगितले.
Join Our WhatsApp Community