बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरच्या गाड्या कमी झाल्या का? राज ठाकरे कडाडले

सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही?

ठाकरे सरकारने सणावर घातलेल्या बंदीमुळे राज ठाकरे चांगलेच संतापले असून, त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरी, तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. एवढेच नाही तर बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

सणांवरच बंदी का?

बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झाल्याचे दिसत नाही. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही, तर या सणांवरच बंदी का घातली जाते? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल, असं सांगितलं होतं असे राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः निवडणुका आणि लॉकडाऊनवरुन राज ठाकरेंचा सरकारवर खळबळजनक आरोप)

लॉकडाऊन आवडे सरकारला

गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती सध्या झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी, तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही.

हे फक्त महाराष्ट्रातच का?

हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांचे काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही? यांना जे हवे तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरवून ठेवायचे, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे.

(हेही वाचाः बोटे छाटणारा बाहेर येऊ दे, भीती काय असते ती दाखवू!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here