महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भव्य सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पुणे येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अर्ज भरत पहिली सदस्य नोंदणी केली आणि त्यानंतर मनसेच्या या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. राज्यभरात मनसेकडून या नोंदणीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे. ही सदस्य नोंदणी ऑनलाईन देखील करता येणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या आवाजात सर्व कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांचे आवाहन
मनसेकडून आपल्या सोशल मीडियावर हँडलवर राज ठाकरे यांच्या आवाजातील हे आवाहन करण्यात येत आहे. मी हिंदवी रक्षक,मी महाराष्ट्र सेवक असे हे सदस्य नोंदणी अभियान मनसेकडून सुरू करण्यात आले आहे. हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच कार्यतत्पर आहे. आता आपल्याला आपले कार्य वाढवायचे आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपला मित्रपरिवार,सोशल मीडियावरील स्नेही या सर्वांसह सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ऑनलाईन माध्यमातून ही सदस्य नोंदणी करता येणार आहे.
View this post on Instagram
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून जोरदारी तयारी सुरू करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत मनसेचा सध्या एक नगरसेवक आहे. हिंदुत्वाचा मुद्दा मनसेकडून उचलण्यात आल्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला त्याचा फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळेच ही सदस्य नोंदणी महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community