गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अयोध्या दौरा हा चर्चेचा विषय ठरतोय. अशातच आता ५ जून रोजी होणारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून यासंदर्भात आज शुक्रवारी अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
(‘मनसे’चं ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेला होणार राज ठाकरेंची सभा)
पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला माघारी परतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्याबाबतची शस्त्रक्रीया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती देतील असे सांगितले जात आहे.
(मनसैनिकांचा ‘चलो अयोध्या’चा नारा! १२ ट्रेन्स, १०० गाड्याभरून अयोध्येत जाणार, कसं आहे प्लॅनिंग?)
पुण्यातील सभा होणारच..
दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा २२ मे रोजी होणार आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे राज हे मुंबईला रवाना झाले, असे सांगण्यात आले. ही सभा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता राज यांची सभा २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
राज्यातून १५ हजार मनसैनिक अयोध्येला जाणार
राज्यातून साधारण १५ हजार मनसैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर काही उत्तर भारतीय कार्यकर्ते राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. यासाठी १२ ट्रेन्स, १०० गाड्याभरून अयोध्येत दाखल होणार आहेत. या दौऱ्यापूर्वी २२ मे रोजी पुण्यात राज ठाकरेंची एक सभा होणार आहे. मुंबई, ठाणे,औरंगाबाद नंतर राज ठाकरेंची पुण्यातील सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Join Our WhatsApp Community