‘प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा?’,फॉक्सकॉन प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा संतप्त सवाल

95

फॉक्सकॉन-वेदांता कंपनीचा सेमी कंडक्टर बनवण्याचा कारखाना महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी देखील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्वीट करत सरकारला सवाल केला आहे. तसेच हा प्रकार बंघीर असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी ट्वीट करत केली आहे.

राज ठाकरे यांचे ट्वीट

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

(हेही वाचाः ‘या’ 26 औषधांमुळे होऊ शकतात कॅन्सरसारखे आजार,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली यादी)

हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हा दुर्दैवी निर्णय- अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील ट्वीट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.