राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे. मनसेच्या इतर संघटनांची एक बैठक राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. त्यानंतर राज ठाकरे बोलत होते.
…म्हणून वाईट वाटतं
पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या समान मुलांसारखं असलं पाहिजे. सध्या राज्यातलं प्रत्येक प्रकल्प हा गुजरातला जात आहे, याचं जास्त वाईट वाटतं. तो इतर कुठल्या राज्यात गेला असता तर त्याचं इतकं काही वाटलं नसतं. कारण प्रत्येक राज्याचा विकास व्हायला हवा. त्यामुळे पंतप्रधानांचा विचार हा विशाल आणि देशाचा असला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या राज्यातील राजकारण खालच्या पातळीचं
महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत इतर कोणत्याही राज्याच्या पुढे आहे. उद्योगपतींना देखील उद्योगाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रथम पसंतीचं राज्य आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्टीने न पाहता देशाच्या विकासाच्या दृष्टीने पहावं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या राज्यातील राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीचे आहे. आरोप करण्यासाठी जी काही भाषा वापरली जात आहे तशी भाषा आजवर महाराष्ट्रात कधी पहायला मिळाली नव्हती. त्यामुळे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community