संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आता हर हर महादेव या चित्रपचावरुन राज्यात वाद पेटला आहे. सोमवारी रात्री ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत हा शो पुन्हा सुरू केला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटावरुन मनसेच्या पदाधिका-यांना सूचना दिल्या आहेत.
या विषयावर बोलू नका
हर हर महादेव या चित्रपटावरुन सध्या राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मुद्द्याला जातीय रंग देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाबाबत कोणीही काहीही बोलू नका, अशा स्पष्ट सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिका-यांना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राडा
हर हर महादेव या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला हा सिनेमाचा शो बंद पाडला. त्यानंतर तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रेक्षकांना मारहाण देखील केली. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव हे विवियाना मॉल येथे पोहोचले आणि त्यांनी या चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला.
अविनाश जाधवांची टीका
जर तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करत असाल तर सिनेमागृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणं हे संस्कृतीला धरुन आहे का?, असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी आव्हाड यांना केला होता. तुम्ही काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री होतात त्यामुळे तुम्ही कायदा हातात कसा काय घेऊ शकता. त्यामुळे मारझोड करणं ही तुमची सवय असल्याचे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, अशी संतप्त टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी आव्हाड यांच्यावर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
(हेही वाचाः KGF-2 सिनेमातील गाण्यांचा काँग्रेसला फटका, ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचे न्यायालयाचे आदेश)
Join Our WhatsApp Community