मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथील हाय व्होल्टेज सभा मंगळवार 12 एप्रिल रोजी पार पडली. या उत्तरसभेत त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक पक्षांच्या पुढा-यांनी जे तारे तोडले ते ऐकल्यानंतर याचे उत्तर देण्यासाठी मी ही सभा घेत आहे. मी गुढीपाडव्याच्या सभेत भाजपवर टीका केली नाही, त्यामुळे मी माझी भूमिका बदलल्याचा आरोप माझ्यावर होत आहे. पण मला जे खटकले ते मी त्या-त्या वेळी बोललो आणि यापुढेही खटकले तर बोलेन असे सांगत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत.
(हेही वाचाः ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)
काय आहेत मागण्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवल्यानंतर मी त्यांचे अभिनंदन केले होते, असे सांगत त्यांनी मोदींकडे आता दोन मागण्या केल्या आहेत. देशात समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करा, या गोष्टी या देशात होणे आवश्यक आहे. सध्या देशात लोकसंख्येचा विस्फोट होत आहे, त्यामुळे या गोष्टी होणे हे देशाच्या भल्याचे आहे. ज्या गोष्टींना मला विरोध करायचा होता तो मी केला आणि उद्या जर काही वाटले तर पुन्हा करेन, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप)
नोटिसांना भीक घालत नाही
नरेंद्र मोदी यांच्या काही गोष्टी खटकल्या त्या मी उघडपणे मांडल्या. मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलल्याचे बोलले जात आहे. पण मला कुठलीही नोटीस आली तर मी अशा नोटिसांना भीक घालत नाही. मोदींच्या काही गोष्टी मला नाही पटल्या तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली, पण जेव्हा कलम 370 हटवलं तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पहिलं ट्वीट मी केलं होतं. मोदींसारखी व्यक्ती देशाची पंतप्रधान असावी, हे बोलणारा मी पहिला नेता होतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
(हेही वाचाः ‘वसंतसेना ते शरदसेना’ असा शिवसेनेचा प्रवास! संदीप देशपांडेंनी घेतला समाचार)
Join Our WhatsApp Community