मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या दिलेल्या अल्टिमेटमनंतर बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवर सकाळची अज़ान झाली नाही. याच बाबतीत राज ठाकरे यांनी मौलवींचे आभार मानले. तसेच हा विषय एका दिवसाचा नाही तर कायमस्वरुपी आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः ‘या’ मशिदींवर कारवाई कधी होणार? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी)
काय म्हणाले राज ठाकरे?
मुंबईत एकूण 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये बुधवारी सकाळी 5च्या आत अज़ान सुरू झाली. पण ज्या ठिकाणी अज़ान झाली नाही, तिथल्या मौलवींचे मी आभार मानतो. पण हा विषय केवळ 4 मेपुरता मर्यादित नाही. ज्या मशिदींवरचे मौलवी ऐकणार नाही, त्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली गेली पाहिजे. तसेच मुंबईतल्या या 135 मशिदींवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्याची अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
धार्मिक वळण द्यायचं नाही, पण…
सणासुदीच्या दिवशी लाऊडस्पीकर्सना जरुर परवानगी द्यावी. पण 365 दिवस सकाळ संध्याकाळ जे भोंगे चालतात, त्याचा वृद्ध, महिलांना त्रास होता. माणुसकी पेक्षा यांचा धर्म मोठा आहे का, असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला. जी प्रार्थना करायची ती मशिदींमध्ये करा पण भोंग्यांचा आवाज होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यातील शांतता बिघडवण्याची आमची इच्छा नाही. हा मुद्दा धार्मिक नसून, सामाजिक आहे. पण कोणी जर त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्हीही त्याला धर्मानेच उत्तर देऊ, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ, भोंग्यांबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब?)
Join Our WhatsApp Community