मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे वृत्तपत्र सुरू करुन एक चळवळ सुरू केली होती. मात्र आता ही चळवळ संपून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चळवळ राहिली आहे, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
तसेच 27 नोव्हेंबरला मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा भरवण्यात आला असून यादिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सगळ्यांचा हिशोब करतील, असे संकतेही देशपांडे यांनी दिले आहेत.
सगळ्यांचा हिशोब होणार
27 नोव्हेंबर रोजी नेस्को येथे दुपारी 4 वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या जो काही गढूळपणा आला आहे त्यावर तुरटी फिरवण्याचे काम राज ठाकरे 27 तारखेला करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. 27 नोव्हेंबरला प्रत्येकाचा हिशोब होईल, असा इशाराही देसपांडे यांनी ट्वीट करत दिला आहे.
27नोव्हेंबर "सबका हिसाब होगा"!!
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 22, 2022
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीकोनातून मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत शिंदे-भाजप आणि मनसे यांची युती होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र याबाबत कोणत्याही पक्षाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. पण मनसे मात्र स्थानिक पातळीवर पक्षाला बळ देण्यासाठी जोमाने काम करत आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी उत्तर मुंबई मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघातील मराठी भाषिक मतदार निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असल्याने राज ठाकरे यांनी या मतदारसंघाचे दौरे करण्यास देखील सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community