अखेर सभेचं ठिकाण ठरलं! ९ तारखेला ठाण्यात होणार ‘राज’गर्जना

118

मागील दोन वर्ष राज्यात कोरोनाचा कहर असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सभा, मेळावे, संमेलनांवर बंदी होती. तब्बल दोन वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली. या सभेनंतर आता राज ठाकरे येत्या ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याने ठाण्यातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा, एसटी कामगारांना न्यायालयाचा आदेश)

ठाण्यातील सभेचं ठिकाण निश्चित

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या सभेसाठी पोलिसांनी मनसेने ठरवलेल्या जागेऐवजी शहरांतील इतर दोन जागांचे पर्याय सुचवले आहेत. मात्र हे पर्याय मनसेच्या नेत्यांना मान्य नव्हते. आम्ही ठरवलेल्याच जागी राज ठाकरे यांची सभा होणार, असा स्पष्ट इशारा मनसैनिकांनी दिला आहे. यानंतर ही सभा आता गडकरी रंगायतन समोरील रस्त्याऐवजी जुन्या ठाण्यातील गजानन महाराज चौकाजवळ होणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे. त्यामुळे ठाण्यात येत्या ९ तारखेला ‘राज’गर्जना होणार आहे. गजानन महाराज चौक हा गडकरी रंगायतनपासून हाकेच्या अंतरावर आहे. आता परवानगी मिळाल्याने मनसेचे पदाधिकारी जय्यत सभेच्या तयारीला लागले आहेत.

या कारणास्तव मनसेची परवानगी नाकारली 

ठाणे शहरात शनिवारी राज ठाकरे यांची सभा निश्चित करण्यात आली आहे. परंतु त्याचदिवशी गडकरी रंगायतनमध्ये एका काव्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्यासह काही अतिमहत्त्वाचे व्यक्ती उपस्थित असणार आहे. तसेच या रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तलावपाली येथे चैत्र नवरात्रौत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी रंगयातन येथे सभा घेतल्यास सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव मनसेला गडकरी रंगायतन येथे सभेसाठी परवानगी मिळालेली नव्हती.

मनसेने पोलिसांना सूचविला हा पर्याय

ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर शुक्रवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणीदेखील केली. त्यावेळी मनसेने पदाधिकाऱ्यांनी गडकरी रंगायतन जवळील गजानन महाराज चौक येथील एकदिशा मार्गिकेचा पर्याय सूचविला आहे. या पर्यायास पोलिसांनी परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.