‘सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीच नव्हता म्हणतं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर थेट २२ मार्चला, गुढीपाडव्याच्या दिवशी सिनेमा दाखवणार,’ असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मनसेच्यावतीने सोमवारी मराठी राजभाषा दिनाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आपले परखड मत मांडले.
नक्की काय म्हणाले राज ठाकरे?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता ‘मनसेचा एकच आमदार, तो जर दुसरीकडे गेला तर त्यांना चिन्ह देणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. यासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय’. महाराष्ट्रात हे काही चालू आहे, जे काही झालंय याविषयी सविस्तर मी २२ तारेखाला शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी बोलणार आहे. मला आता कुठचाही ट्रेलर, टीझर टाकायचा नाही. मला थेट २२ तारखेला सिनेमा दाखवायचा आहे. त्याच्यामुळे आता मला यावर काहीच बोलायचे नाही.’
राज ठाकरेंनीच मुलाखतकर्त्याची घेतली फिरकी
तरीही मुलाखतकाराने राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनीच मुलाखतकर्त्याची फिरकी घेतली. ‘तुमचे आवडते वकील जेठमलानी आहेत का? कारण जेठमलानी एकच प्रश्न सहा ते सात प्रकारे विचारतात. पण खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील, त्या विरोधी असतील किंवा कुठच्याही असतील, या सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. मी त्यादिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळ्याला गेलो होतो. त्यावेळेला खाली सगळे बसले होते, मला कळतच नव्हते कोण कुठल्या पक्षातील आहे. समोरून कोणी नेता आला आणि सांगितले की, मी आमदार आहे. आता तर त्याला विचारावे लागते, कुठल्या पक्षाचा?’
(हेही वाचा – “मी सामना आणि मार्मिक वाचत नाही”, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले)
‘आज याच्याबरोबर फुगडी तर उद्या त्यांच्याबरोबर झिम्मा’
‘सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहताच मतदारांना काही किंमत आहे असे मला वाटत नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा, मोकळे व्हा. बाकी आमचे आम्ही नाचायचे आहे ते नाचतू. आज याच्याबरोबर फुगडी तर उद्या त्यांच्याबरोबर झिम्मा,’ अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Join Our WhatsApp Community