मनसेच्या गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविषयी जी भूमिका घेतली, त्यामुळे मनसेचे नेते वसंत मोरे नाराज झाले होते. मात्र राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष भेटल्यावर मोरे यांची नाराजी दूर झाली आणि ते मंगळवारी, १२ एप्रिल रोजी मनसेच्या ठाण्यातील उत्तर सभेला हजर होण्यासाठी पुण्याहून ठाण्यात आले. या सभेत राज ठाकरे यांच्या आधी वसंत मोरे यांचे भाषण होणार आहे. या भाषणात ते आता काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
घरातले लग्न बाजूला ठेवून सभेला निघाले
९ एप्रिल रोजी ही उत्तरसभा होणार होती, तेव्हा मी जाणार होतो. पण ही सभा रद्द होऊन ती १२ एप्रिल रोजी घेण्यात आली. मात्र १२ एप्रिल रोजीच माझ्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नाचा एक कार्यक्रम आहे. परंतु साहेबांनी सोमवारी सभेला यायलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. मग आधी लग्न कोंढाण्याचे, घरचा कार्यक्रम घरचे करतील. मी कुटुंबात लहान आहे. दोन मोठे भाऊ आहेत. ते लग्नाच्या समारंभाचा कार्यक्रम करतील. मी ठाण्याच्या सभेसाठी पुण्याहून निघालो आहे, असे वसंत मोरे यांनी निघताना माध्यमांना सांगितले.
राज ठाकरे ठाण्याकडे रवाना
संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा ठाण्यातील सभेसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाहून रवाना झाला. मुलुंड चेक नाका येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी मनसैनिकांनी केली आहे. येथे स्वागत झाल्यावर ते सभास्थळी दाखल होतील. आजच्या उत्तरसभेत राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
Join Our WhatsApp Community