मनसे अध्यक्ष राज ठाकरे… सत्ता असो किंवा नसो राज ठाकरेंची क्रेझ आजही मराठी माणसांच्या मनात कायम आहे. आज राज ठाकरेंचा वाढदिवस. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने, राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करा, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र आता कोरोना काळ संपल्यानंतर राज ठाकरे स्वत: मैदानात उतरणार असून, झंझावाती दौरे करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, आता राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे.
राज ठाकरेंचा झंझावात
आता राज ठाकरेंच्या झंझावाती दौऱ्याला सुरुवात होईल, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. त्यामुळे आता राज ठाकरेंचे हे दौरे सरकार आणि विरोधक यांच्यावर नक्कीच हल्लाबोल करणारे ठरणार आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महापालिका आणि इतर निवडणुकांची मनसेची जय्यत तयारी झाली आहे. कोरोना काळ संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
(हेही वाचाः राज ठाकरे भावुक… कार्यकर्त्यांच्या घरी पाठवले पत्र!)
मनेस कार्यकर्त्यांनी राखले सामाजिक भान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनांचे पालन करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम केले. मनसे नेते अखिल चित्रे यांनी युवकांसाठी आणि अनाथांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला, तर नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे.
या पुस्तकांची भेट
मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. पुस्तकांच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, ना. धों. महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर, यशवंतराव आणि मी, वाघनखं , सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती-एक मागोवा, अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे.
(हेही वाचाः आम्ही निवडणूक, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो… राज ठाकरेंचा घणाघात)
राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
राज्यात कोरोनाचे संकट असल्याने राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाहीत. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहत असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे, मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही, असे पत्र देत राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community