उद्धव ठाकरे देणार भावाला सुरक्षा?

119

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता त्यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रामुळे एकच खळबळ माजलेली असताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः शिवसेनेने चोरली राज ठाकरेंच्या सभेची गर्दी)

मिळणार झेड प्लस सुरक्षा?

आपल्याला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत त्यांना या संदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर बुधवारी बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. जवळपास 20 मिनीटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबई पोलिस आयुक्त पांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी गृहमंत्र्यांनी नांदगावकर यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. तसेच या पत्राबाबत राज्याच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असून, राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर मैदानात; गृहमंत्र्यांंची घेतली भेट)

सुरक्षा वाढवण्याचा विचार

राज ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा 2020 मध्ये कमी करत ठाकरे सरकारने त्यांना व्हाय प्लस सुरक्षा देऊ केली. मात्र आता राज ठाकरेंना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे वरिष्ठ पातळीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या विचार राज्याचे गृहखातं करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बाळा नांदगावकर यांच्याही सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.