आपल्या आक्रमक शैलीत मराठी माणसाचा आवाज उचलून धरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांनी हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी देत मोठी बॅनरबाजी केली होती. मात्र राज ठाकरे यांना मराठी हृदयसम्राट याव्यतिरिक्त इतर कोणतीही उपाधी लाऊ नये असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काढण्यात आले आहेत. मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने एका निवेदनामार्फत हे आदेश दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
(हेही वाचाः राऊतांच्या पत्रकार परिषदेपेक्षा नेत्यांच्या ट्वीटचाच होतोय ‘गाजावाजा’)
काय आहे निवेदन?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. “महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या “मराठी हृदयसम्राट” या उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. कृपया या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे ही नम्र विनंती.”, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
सोमवारी मनसेच्या घाटकोपर येथील शाखेचा उद्घाटन समारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यावर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. तसेच राज ठाकरे उद्घाटनाला उपस्थित झाले तेव्हाही अशीच घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उचलत शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न तर मनसेकडून करण्यात येत नाही ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्याची दखल घेत मनसेच्या वतीने आता हा आदेश जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचाः अपशब्द वापरणं ही राऊतांची संस्कृतीच! भाजप नेत्यांचे टीकास्त्र)
Join Our WhatsApp Community