मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेची चांगलीच चर्चा आहे. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला. या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणावेळी अज़ान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे यांनी इशारा दिला.
पण 17 वर्षांपूर्वी त्याचठिकाणी बाळासाहेबांच्या झालेल्या सभेवेळी सुद्धा अशीच अज़ान वाजली, तेव्हा बाळासाहेबांच्या विधानानंतर औरंगाबादमध्ये इतिहास घडला. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता राज ठाकरेंच्या भाषणामुळे होईल, अशी आशा मनसे नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचाः भर सभेत अज़ान सुरू झाली तेव्हा मोदींनी काय केलं?)
राज ठाकरेंनी दिला इशारा
औरंगाबाद खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली. या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मनसैनिक आले होते. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार असल्याची बॅनरबाजीही यावेळी मनसैनिकांकडून करण्यात आली होती. राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीवरील भोंग्यावरुन अज़ान सुरू झाली. त्यावेळी ती बंद करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी पोलिसांना दिला. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेबांच्या सभेत काय घडलं होतं?
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एप्रिल 2005 मध्ये याच मैदानात औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा झाली होती. तेव्हा त्यांच्या भाषणादरम्यान सुद्धा अचानक अज़ान सुरू झाली. तेव्हा संपूर्ण मैदानात शांतता पसरली. बाळासाहेबही थांबले. काही वेळाने बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या शैलीत एक हात कंबरेवर ठेवला आणि एक बोट उंचावत बाळासाहेबांनी गर्जना केली, ‘हे,,, याचसाठी विचारतोय तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?’
(हेही वाचाः महाराष्ट्रात तयार झालेत ‘दहा’ नवीन जिल्हे, कोणते? वाचा)
बाळासाहेबांच्या या प्रश्नानंतर शांत असलेली सभा बाळासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांनी दुमदुमून गेली. यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली होती, मनसेला त्यावेळी औरंगाबादमध्ये आपली सत्ता टिकवण्यात यश आलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसेला औरंगाबादमध्ये चांगले यश मिळेल, असे मत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरेंनी राजकारणाची दिशा बदलली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भविष्य उज्वल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा राज ठाकरेंनी बदलली आहे. त्यामुळे औरंगाबादसह राज्यातील येणा-या सर्व महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला नक्कीच चांगले यश मिळेल, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा पोलिसांनी केला ५ तास अभ्यास)
Join Our WhatsApp Community