पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, आधी मदत करा! राज ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र

अशावेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा तातडीने कृती करण्याची गरज आहे.

गुलाब चक्रीवादळाचा राज्याला जोरदार फटका बसला असून, राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. याच पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाने ओल दुष्काळ जाहीर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबतीत सरकारकडे हीच मागणी केली आहे. राज्य सरकारला पत्र लिहून राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याची आग्रही मागणी केली आहे.

ही आणीबाणीची वेळ

महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. पिकांसोबतच घरा-दाराचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यासाठी ही आणीबाणीची वेळ आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आश्वासनांपेक्षा कृतीची गरज

या बिकट प्रसंगी पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, पण त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतक-याला 50 हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करुन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. आधी कोरोना आणि नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडला आहे. अशावेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा तातडीने कृती करण्याची गरज आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा

प्रशासनाकडून नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीसोबतच घरांच्या व गुरांच्या नुकसानाचाही विचार होईल व रितसर मदत केली जाईल. परंतु तोपर्यंत वाट पाहण्याची ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, असी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here