पुणे शहरात मनसेने प्रशासनाला पुन्हा एकदा दणका दिला आहे. एका दिव्यांग व्यक्तीच्या गाडीला लावलेला जॅमर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी चक्क हातोड्याने तोडून टाकला आहे. दिव्यांग व्यक्तीवर होणारा अत्याचार सहन केला जाणार नाही, माझ्यावर काय कारवाई करायची ती करा, असा इशारा देत दिव्यांग व्यक्तीच्या मदतीला मनसे नगरसेवक धाऊन आले आहेत.
कारवाईचं खुलं आव्हान
फळ विक्री करणाऱ्या अपंग व्यक्तीच्या गाडीला अतिक्रमण विभागाने जॅमर बसवला व त्यानंतर 3 ते 4 दिवस ती व्यक्ती दंड भरुन संबंधित जॅमर काढून घेण्यासाठी प्रयत्न करत होती, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून, मनसे स्टाईलने जॅमर तोडून त्या अपंग व्यक्तीची गाडी जॅमरपासून मुक्त केली. तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्यावर जी कारवाई करायची ती करा, असं खुलं आव्हान नगरसेवक वसंत मोरे यांनी दिलं आहे.
(हेही वाचाः ठाकरे सरकारवर टीका, केंद्राच्या निर्णयावर मात्र भाजप नेते गप्प!)
आक्रमक मोरे
पुणे महापालिकेचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे कायमच चर्चेत असतात. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुजोरी विरोधात तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला वसंत मोरे हे नेहमीच धाऊन येत असतात.
Join Our WhatsApp Community