नवाब सेनेबरोबर कोणी राहिलंय की नाही? उद्धव आणि आदित्य ठाकरेंना मनसेने डिवचले

99

शिंदे गटाने सोमवारी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला देखील शिवसेनेच्या तब्बल 12 खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

अशातच आता मनसेकडून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत नवाब सेनेबरोबर कोणी राहणार की नाही?, असा सवाल करत दिपाली सय्यद आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! पक्षप्रमुखपदी कोण?)

नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही?

गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. आमदार गेले,नगरसेवक गेले आणि आज ऐकतोय तर काय खासदारही गेले. अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही? बहुतेक सय्यद बंडा आणि विश्व प्रवक्ते हे दोघेच मोठे नवाब,छोटे नवाब यांच्या बरोबर राहतील असं चित्र दिसतंय, अशा शब्दांत गजानन काळे यांनी खासदार संजय राऊत आणि दिपाली सय्यद यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः रामदास कदमांनी ‘या’ ५ कारणांमुळे उद्धव ठाकरेंना केला ‘जय महाराष्ट्र’!)

खासदारही करणार जय महाराष्ट्र?

आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये घेतलेल्या बैठकीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाणे, भावना गवळी, हेमंत पाटील,प्रतापराव जाधव,श्रीरंग पारणे, संजय मंडलिक,सदाशिव लोखंडे,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, धैर्यशील माने हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.