बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ! मनसेने केली मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

कोरोना रुग्णांना आयसीयू विभागात मिळत असणा-या चुकीच्या उपचारांमुळे तेथील रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे.

95

दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. पण अशातच मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या बीकेसी कोविड सेंटरच्या आयसीयू विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या आयसीयू विभागात केवळ एकच एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली आहे. त्यामुळे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

काय म्हणाले अखिल चित्रे?

बीकेसी कोविड सेंटरच्या आयसीयू विभागातील भोंगळ कारभाराबाबत 30 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण पत्र लिहीत माहिती दिली होती. या पत्रासोबतच बीकेसीतील आयसीयू विभागात काम करणा-या डॉक्टरांची एक यादी आपण दिली होती. त्यामध्ये या आयसीयू विभागात केवळ एकच एमबीबीएस डॉक्टर काम करत असून, 90 टक्के डॉक्टर हे बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस आहेत, याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले होते. पण ही सर्व माहिती आपण पुराव्यांसहित पाठवून सुद्धा दुर्दैवाने व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसल्याने, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या आयसीयू विभागासाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदारावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना त्याबाबतची आठवण करुन देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना हे स्मरणपत्र लिहीत आहोत, असे अखिल चित्रे यांनी सांगितले.

काय आहे पत्रात?

बीकेसी कोविड सेंटरमधील कंत्राटदार तेथील वैद्यकीय कर्मचा-यांबाबत सरकारची दिशाभूल करत आहे, ही बाब 30 एप्रिल रोजी तुम्हाला लिहिलेल्या पत्रात मी पुराव्यांसहित लक्षात आणून दिली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेला सामोरे जात असताना कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची वानवा असणं, ही गोष्ट चिंताजनक आहे. पत्रासोबत जोडलेली बीकेसी केविड सेंटरमधील नवशिक्या डॉक्टरांची यादी महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिष्ठाता आणि कंत्राटदार यांच्या गैरकारभाराची साक्ष देते. पण तरीही याबाबत काहीही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेस तडा जाईल, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

akhil1485 1395942248454316034 20210522 084902 img1

चुकीच्या उपचारांमुळे वाढतोय मृत्यूदर

सर्वसामांन्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनातर्फे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पण प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार मात्र यात आपला फायदा करुन घेत आहेत. कोरोना रुग्णांना आयसीयू विभागात मिळत असणा-या चुकीच्या उपचारांमुळे तेथील रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. हे न बघवल्याने बीकेसी कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणा-या एका तरुणानेच ही माहिती समोर आणली. पण त्यानुसार कंत्राटदारावर कारवाई करायचे सोडून, प्रशासकीय अधिका-यांनी त्या तरुणालाच सूडबुद्धीने लक्ष्य केले आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून, आपण जर याकडे दुर्लक्ष केलंत तर ते कंत्राटदार व प्रशासकीय अधिका-यांच्या पथ्यावर पडेल आणि कोरोना रुग्णांची हेळसांड होईल आणि तेथील प्रामाणिक आरोग्य कर्मचा-यांच्या मनोबलावरही परिणाम होईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालावे, अशी विनंती चित्रे यांनी पत्रातून केली आहे.

या मंत्र्याचे घेतले नाव

या गैरकारभाराबाबत जेव्हा आम्ही कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिका-यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला मग्रुरीत उत्तरे दिली. हे कंत्राट आम्हाला नवाब मलिकांच्या सहकार्याने मिळालं आहे, त्यामुळे आमचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, अशी अरेरावीची भाषा त्यांनी केली. ही भाषा या संकटकाळात खेदजनक आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी असल्याची खंत या पत्राद्वारे चित्रे यांनी व्यक्त केली आहे.

akhil1485 1395942248454316034 20210522 084902 img2

अन्यथा न्यायालयात जावे लागेल

आपण मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन हा गैरकारभार करणा-यांवर कारवाई करा, नाहीतर अनर्थ अटळ आहे. हा कारभार उघडकीस आणण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांचे एक भरारी पथक नेमावे आणि सत्यपरिस्थिती जाणून घ्यावी. याकडे दुर्लक्ष झाल्यास आपल्याला नाईलाजाने न्यायालयाचे दार ठोठावावे लागेल, असा इशाराही अखिल चित्रे यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.