‘हर हर महादेव’ सिनेमाचा ठाण्यातील विवियाना मॉलमधला शो सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्तीने बंद पाडल्याचे समोर आले. या सिनेमाचा वाद अजूनही सुरूच आहे. हा वाद काही थांबताना दिसत नाही. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. पुण्यात आज, बुधवारी मनसेच्या वतीने सिनेमाचे शो रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास खळखट्याक होईल, असा इशाराच मनसेने दिला आहे.
हर हर महादेव चित्रपटाला विरोध होत असून या सिनेमाचे शोज रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिला आहे. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी चित्रपटाला विरोध करू नका, असे सांगतानाच मनसे पदाधिकारी आज पुन्हा शोज सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – येरवडा कारागृहात तुफान राडा! कैद्यांच्या दोन गटात दगडफेक, हवालदारालाही मारहाण)
दरम्यान, पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आज दुपारपासून पुन्हा सुरु केले जाणार आहेत. पुण्यातील थिएटरमध्ये या सिनेमाचे शो दाखवले गेले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणाच्याही दबावाखाली येत सिनेमाचे शो बंद करू नका, अशी भूमिका घेत मनसे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी आणि मनसे पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसे नेते, मनसैनिक आणि कार्यकर्ते दुपारनंतर पुण्यातील विविध चित्रपटगृहांचा आढावा घेणार आहे.
Join Our WhatsApp Community