सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक दुकाने आहेत. येथून अनेक भाविक बाप्पासाठी प्रसाद, हार- श्रीफळ विकत घेतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २२ महिने ही दुकाने बंद झालेली आहेत. निर्बंधानुसार मंदिरात प्रसाद, हार नेण्यास परवानगी नाही. हिंदू मंदिरांच्या बाहेर ही वेगळी अर्थव्यवस्था उभी आहे आणि हे स्थानिक लोक या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या दुकानदारांचे उत्पन्न सर्वस्वी भाविक प्रसाद-हार, खरेदी करतात यावर अवलंबून आहे. २२ महिने निर्बंध असल्यामुळे या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या स्थानिक दुकानदारांच्या व्यथांची दखल घेत, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्वरित या लोकांचा विचार करा अशी विनंती शासनाला केली आहे.
( हेही वाचा : कचऱ्याची जागा व्यापाऱ्याला : मनसे आक्रमक )
स्थानिक दुकानदारांना असा वेगळा न्याय का?
या लोकांनी स्वत:चे दु:ख अनेकवेळा शासन दरबारी मांडले आहे. माणूस म्हटलं की, दोन वेळचे जेवण, कपडालत्ता, वेळप्रसंगी आजरपणाचा खर्च होतो. हे लोक एवढे पैसे कुठून आणणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. देवळात कोरोनाच्या भितीने हार-श्रीफळ नेण्यास बंदी असली तरी, त्याच देवळात आज दानपेट्या मात्र सुरू आहेत. अनेक मोठ-मोठे सेलिब्रिटी येतात त्यांचा प्रसाद बाप्पाचरणी जातो. भाविकांच्या श्रद्धेला बंधन तर, सेलिब्रिटींचे सर्व काही चालते, स्थानिक दुकानदारांना असा वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
( हेही वाचा : अडीच महिन्यांनंतर अखेर मुख्यमंत्र्यांचे होणार प्रत्यक्ष दर्शन! )
स्थानिक दुकानदारांच्या व्यथांची दखल
माझी शासनाला हात जोडून विनंती आहे आता तरी या लोकांचा विचार करा! २२ महिन्यात शासनाने काहीही आर्थिक मदत दिलेली नाही. हे लोक आपल्या समाजाचा घटक आहेत. कोरोनाचा संसर्गही कमी झालेला आहे त्यामुळे या लोकांचा विचार करण्याची हात जोडून विनंती संदीप देशपांडे यांनी शासनाला केली आहे. शासनाने जिम, रेस्टॉरंट चालू केल्यावर या स्थानिक दुकानदारांच्या पोटावर पाय का? हा प्रश्न उपस्थित करत, देशपांडे यांनी या स्थानिक दुकानदारांच्या व्यथांची दखल घेतली आहे.
Join Our WhatsApp Community