राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत, राज्यात दहीहंडी साजरी करण्यास प्रतिबंध आणला आहे. मात्र तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी, ३१ ऑगस्ट रोजी दहीहंडी बांधणारच, असा निश्चय करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क दहीहंडीची घोषणा केली आहे. मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी लावलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर हिंदू धर्म रक्षणार्थ दहीहंडी उत्सव असा उल्लेख केला आहे. यावरून मनसेने दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून हिंदुत्वाची हाक दिली आहे.
आदेश राजसाहेबांचा…
हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात
उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा.
चलो ठाणे👍🏽— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 30, 2021
मनसेचा हिंदुत्वाचा नारा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वीच मनसेचा झेंडा बदलून तो भगवा केला होता. तेव्हापासून मनसे प्रखर हिंदुत्वाच्या दिशने राजकीय वाटचाल करून शिवसेनेला शह देणार अशी चर्चा रंगली होती. आता हाच हिंदुत्वाचा धागा पकडत मनसेने दहीहंडीला हिंदुत्वाचा नारा दिला आहे. पक्ष स्थापनेपासून मराठीचा मुद्दा हाती घेतलेली मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडताना पहायला मिळत असून, आता दहीहंडीच्या माध्यमातून मनसे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे सरसावली आहे. मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी लावलेल्या बॅनरने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ओशिवऱ्यातही मनसेची हंडी
राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने सुद्धा सण, उत्सव साजरे करू नये, असे आदेश दिले आहे. पण, तरीही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा पवित्रा घेतला आहे. एकीकडे ठाण्यात अविनाश जाधव हे दहीहंडीची तयारी करत असताना आता वर्सोवाचे मनसेचे विभाग संदेश देसाई हे देखील वर्सोव्यात दहीहंडी साजरी करणार आहेत.
मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात!
राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यात प्रतिबंध केला आहे. मात्र सरकारचा हा आदेश धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community