…तर मनसे खड्ड्यांना मनपा आयुक्त, अभियंता यांची नावे देणार!

महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचा इशारा दिलेला आहे, अन्यथा मनसे स्वतः रस्त्यांवर उतरून या विरोधात आंदोलन करणार असल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

71

सध्या गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची लगबग सुरु होणार आहे. एका बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन आता कुठे तरी पूर्वपदावर येत आहे, चाकरमानी पुन्हा आपल्या काम व्यवसायाकरीता बाहेर पडला आहे. परंतु ही संकटे कमी की काय म्हणून महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरीकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. जर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर रस्त्यांवर उतरून मनसे खड्यांना मनपा आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची नावे देणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.

नवी मुंबईतील खड्डे दोन दिवसांत बुजवा!

नवी मुंबईकरांना सालाबादाप्रमाणे यावर्षीही आपली वाहने रस्त्यांवरून चालवताना खड्डयातून मार्ग काढावा लागत आहे. मुंबई शहराच्या अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य दिसत असून कित्येक वेळा नवी मुंबईकरांना अपघाताला देखील सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे. नवी मुंबईसारख्या प्रगत आधुनिक आणि नियोजित शहराला खड्डयांचे लागलेले ग्रहण सुटताना दिसत नाही. या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचा इशारा दिलेला आहे, अन्यथा मनसे स्वतः रस्त्यांवर उतरून या विरोधात आंदोलन करणार असल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सुमार दर्जाचे काम महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यादेखत सुरु

प्रत्येक वर्षी नवी मुंबईतील करदात्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळण करत करोडो रुपये खर्च करून निविदा मागवून रस्ते बनवले जातात, बनविलेले रस्ते एकाच पावसात त्यांची दयनीय अवस्था होते, त्यावर खड्डे पडलेले असतात. असे सुमार दर्जाचे काम महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यादेखत सुरु असते तरी त्यांच्याकडून संबंधीत कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पुन्हा त्याच कंत्राटदारांना महापालिकेकडून बक्षिसी स्वरूपात अधिकची कामे दिली जातात. हे अधिकारी व कंत्राटदारांचे गौडबंगाल जो पर्यंत नवी मुंबईतून हद्दपार होत नाही, तो पर्यंत नवी मुंबई वासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते मिळणार नसल्याचे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.