मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. भोंगे उतरवण्यासाठी आता मनसे पुढचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भोंगे उतरवण्यासाठी आता मनसे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. अॅड. किशोर शिंदे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. तसेच मनसेचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार बाळा नांदगांवकर यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरेंनी बोलावली बैठक
भोंग्यांविरुद्ध आता मनसे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याची माहिती, मनसे विधी विभागाचे राज्य अध्यक्ष अॅड. किशोर शिंदे यांनी दिली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत देशभरातील कोणत्या राज्यांत मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात न्यायालयानं नेमके काय आदेश दिले आहेत, त्याचा आढावा मनसैनिकांकडून घेण्यात येणार आहे.
(हेही वाचाः ‘काका मला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या’, मनसेचा पवारांना खोचक टोला!)
राज ठारे निर्णय घेतील- नांदगांवकर
सर्वोच्च न्यायालय, उत्तराखंड, अलाहाबाद उच्च न्यायालयांनी याबाबतचे निर्णय दिले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपली योग्य ती भूमिका सर्वांसमोर मांडतील, असे संकेत मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मनसे आक्रमक
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, मनसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांच्या समोर हनुमान चालिसा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून करण्यात येत आहे. पण आता मनसे यावरुन आक्रमक झाली असून, या मुद्द्यावर कायदेशीररित्या आवाज उठवण्याचा निर्णय घेण्याची तयारी मनसेने दर्शवली आहे.
(हेही वाचाः पोलिसांचे राज ठाकरेंना दोन पर्याय)
Join Our WhatsApp Community