मनसेकडून आता गटाध्यक्षांचा शोध सुरू

138

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा पक्षाची विस्कटलेली घडी  बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता मनसेनेही येत्या २७ नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा त्याच जागी अर्थात गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये घेणार आहे. परंतु मागील काही वर्षांपासून मनसेचे पदाधिकारीच विखुरलेले गेले असून विभाग अध्यक्ष असला तरी शाखाध्यक्ष नाही आणि शाखाध्यक्ष असले तरी गटाध्यक्ष नाही अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे. त्यामुळे आजही मनसेकडे गटाध्यक्ष हे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने मनसे नक्की मेळावा कुणाचा घेणार असा प्रश्न खुद्द मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाच वाटू लागला आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्र  नवनिर्माण पक्षामध्ये पुन्हा एकदा जान दिसून येवू लागली आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्यापासून मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारसोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समीकरण जुळून येत असल्याने भविष्यात हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका सार्वत्रिक  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा पक्षाची संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली असून राज ठाकरे यांनी येत्या २७ नोव्हेंबर रोजी गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगाव नेस्कोमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला खतपाणी घालणारा ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चा कार्यक्रम हिंदूंनी हाणून पाडला)

एक मतदान केंद्रासाठी चार ते पाच गटाध्यक्षांची नियुक्ती करण्याचा आदेश

महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे ०७ नगरसेवक निवडून आले होते, तर त्या आधीच्या म्हणजे २०१२च्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९च्या विधानसभा  निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे २०१७नंतर मनसेची पक्षावरील पकड  ढिली होत चालली असल्याचे पहायला मिळत आहे. मनसेचे विधानसभा निहाय विभाग अध्यक्षांची नियुक्ती केली असली तरी अनेक मनसेचे २२७ प्रभागांमध्ये आजही शाखाध्यक्ष नसून अनेक महापालिका प्रभागांमध्ये गटाध्यक्षही नाही. त्यामुळे गटाध्यक्षांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे. अनेक ठिकाणी तर गटाध्यक्षही नसून अनेक ठिकाणी कागदावर गटाध्यक्ष असले तरी प्रत्यक्षात ते कार्यरत नाही, असे दिसून येत आहे. सध्या एक मतदान बुथाकरता एक गटाध्यक्षांची नियुक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र एक मतदान केंद्रासाठी चार ते पाच गटाध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी अशाप्रकारचे आदेश बजावले आहे.

मनसेला पुन्हा मजबूत पाय रोवण्याची गरज

परंतु जिथे एक गटाध्यक्ष मिळताना मुश्किल आहे तिथे चार ते पाच गटाध्यक्ष कुठून आणणार असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पडू लागला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात  झाली असून आता संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गटाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जात आहे. मुंबईमध्ये दादर-माहिम, भायखळा, वरळी, बोरीवली, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चांदिवली आदी भागांमध्ये मनसेचे प्रस्थ असून किमान या भागांमध्ये तरी मनसेला पुन्हा मजबूत पाय रोवण्याची गरज आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारीच सक्रीय नसल्याने कार्यकर्तेच राहिलेले नाही. त्यामुळे जिथे कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली तिथे गटाध्यक्ष कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.