‘मनसे’ची नवी टॅगलाईन… राज ठाकरेंच्या मेळाव्याचा पहिला टीझर रिलीज

95

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिंवली, औरंगाबाद, पुणे महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर केल्या जाऊ शकतात. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या बैठकांची मालिका सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईत पहिलं भाषण होणार आहे.

(हेही वाचा – राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर, मनसैनिकांना कोणता कानमंत्र देणार?)

येत्या २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील गोरेगावच्या नेस्को याठिकाणी मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा मनसेकडून होणार आहे. यावेळी राज ठाकरे गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मेळाव्याचा पहिला टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मनसेने त्यांची नवी टॅगलाईन दिली आहे.

कसा आहे टीझर

या टीझरमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे, अशी जनभावना आहे, असे म्हटले असून त्यानंतर चला, हे चित्र बदलूया आपण महाराष्ट्राला पर्याय देऊ या अशी साद घालण्यात आली आहे. या टीझरमध्ये “चला, पुन्हा नव्याने स्वप्न नवे पाहूया, नव महाराष्ट्र घडवूया” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पर्याय द्यायला तयार आहे…! असे कॅप्शनही देण्यात आले आहे.

राज ठाकरे हे मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सर्कीट हाऊसमध्ये मनसे शहर जिल्हा कार्यकारणी आणि पदाधिकारी यांच्यासह बैठक होणार आहे. यानंतर बुधवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शनही घेणार आहेत. कोल्हापूरनंतर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान राज ठाकरे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर असताना राज ठाकरे मनसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.