जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाने कहर माजवला होता, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी मदत करताना कोणताही भेदभाव केला नव्हता. उत्तर भारतीयांनाही त्यांनी सहाय्य केले होते, त्यामुळे आज जे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत, त्या उत्तर भारतीयांच्या नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे, असे सणसणीत उत्तर मनसे नेते वसंत मोरे यांनी दिले. एका वृत्तवाहिनेला मुलाखत देताना वसंत मोरे बोलत होते. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत येऊ देऊ, अशी भूमिका भाजपचे आमदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे राजकारण नाही
मनसेने मराठीचा मुद्दा त्या त्या वेळी आवश्यक कारणांसाठी काढला होता. त्यात कोणताही चुकीचा विचार नव्हता, त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत असल्याने त्यावर पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये काय भूमिका घ्यायची हे त्यावेळी ठरवण्यात येईल. राज ठाकरे हे आता अयोध्येत जात आहेत, यामागे राजकारण आहे, असे म्हणता येणार नाही. कारण आता कोणत्याच निवडणुका होत नाहीत, ज्या निवडणुका आहेत त्या ७-८ महिन्यानंतर होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामागे राजकारण आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे वसंत मोरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी योगी सरकारची
राज ठाकरे अयोध्येला राजकारण करण्यासाठी जात नाही, सगळे जण अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जातात, तसे राज ठाकरे अयोध्येत जात आहेत. त्यांना राज ठाकरे यांच्या भूमिकेत राजकारण दिसत आहे. पण आमचा तसा उद्देश नाही. राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत जाणारच आहेत, त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तेथील सरकारची आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community