महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने यंदा मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर भागांमधील लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीशी लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकींमध्ये प्रत्येक मतदार संघात आपले उमेदवार रिंगणात उतरण्यात येणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत एकाही जागी आपला उमेदवार न देणाऱ्या मनसेने यंदाच्या लोकसभेत उतरण्याचा निर्णय हा केवळ आगामी विधानसभा निवडणूक आणि स्थानिक निवडणुकांची चाचपणी करण्यासाठीच घेतला असल्याचे बोलले जात आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवल्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा फटका मनसेला बसला होता. त्यामुळे मागील वेळेस केलेली चूक पुन्हा न करता त्यातून शिकत मनसेने आगामी लोकसभा निवडणुकीत किमान आपले मतदार शाबूत ठेवण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. (MNS)
मनसेची स्थापना २००६मध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रथमच म्हणजे सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नाही. आपला प्रादेषिक पक्ष असल्याचे सांगत मनसेने ही निवडणूक लढवली नाही. परंतु यामुळे सन २००७च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून मनसेकडे आलेला मतदार जो टक्का पुढे गेला. परंतु लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार रिंगणात न उतरल्याने तो इतरत्र गेला. पण त्यातील काही मतदार हे परत आलेच नाही. त्यामुळे सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका मनसेला बसला. संपूर्ण राज्यात एकमेव राजू पाटील वगळता मनसेचा आमदार निवडून येऊ शकला नाही. त्यातच सन २०१७च्या निवडणुकीत मनसेचे जे मुंबईत सात नगरसेवक निवडून आले होते, त्यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा एक आमदार आणि मुंबईत एक नगरसेवक अशीच ओळख निर्माण झाली होती. शिवसेनेचे नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचा उल्लेखही संपलेल्या पक्षाचे नेते असा केला होता. (MNS)
(हेही वाचा – Ganja Seized : मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून ३२ किलो गांजा जप्त)
त्यामुळे मनसेला ही ओळख पुसून पुन्हा आपले जास्तीत जास्त आमदार व नगरसेवक निवडणूक आणण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीपासून तयारीला लागावे लागणार आहे. मनसेचे पॉकेट नक्की कुठे आणि किती आहे हे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानावर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये मनसेच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांच्या आधारे विधानसभा निवडणुकीच रणनिती आखता येणार आहे. त्यामुळे मनसेला आता पुन्हा सन २००६नंतर ज्याप्रकारे प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागले होते, त्याप्रमाणे निवडणुकीची पहिल्यापासून तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (MNS)
त्यामुळे मुंबईतील सहाही जागा मनसे यंदा लढवणार असून केवळ मुंबईच नाही, ठाणे, कल्याण आणि राज्यातील इतर लोकसभा मतदार संघातही आपले उमेदवार उभे करून सर्वांसमोर आव्हान निर्माण करणार आहे. मनसेच्या या उमेदवारांचा फटका उबाठा शिवसेना आणि शिवसेना यांना बसणारच आहे, शिवाय भाजपलाही याचा चांगला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही शिवसेनेतील नाराज मतदार हे राज ठाकरे यांच्या मनसेकडे जातील असे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघात मनसेचा उमेदवार निवडून येईल किंवा नाही हे आता स्पष्ट सांगता येत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून मनसेचा हा निर्णय योग्य असल्याचेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (MNS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community