ठाकरेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी मनसे पाठवणार देशपांडे यांना वरळीत

188
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये आता मनसेने आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. मनसेने या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. देशपांडे हे दादर-माहीम विधानसभेतील माजी नगरसेवक असले तरीही आगामी विधानसभेची मजबूत बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे वरळीची जबाबदारी  सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे वरळीची बांधणी करत एकप्रकारे मनसे ठाकरेयांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याच्या तयारीला लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा गड  भेदण्यात देशपांडे यशस्वी ठरतात का? हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
 
विधानसभेच्या  २०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि उमेदवार आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाच्या मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने आपला उमेदवार न देता  एकप्रकारे  आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक सोपी करून टाकली होती. परंतु आगामी २०२४ च्या निवडणुकीत मनसे हे ठाकरे गटाला आणि पर्यायाने आदित्य ठाकरे यांना शह देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. वरळीत मनसेचे संजय जामदार व बंटी म्हशीलकर हे पदाधिकारी असून या विधानसभेचे विभाग प्रमुख हे बंटी म्हशीलकर हे आहेत. परंतु या दोघांना या मतदार संघात मजबूत बांधणी करता आलेली नसल्याने आता या विधानसभेच्या बांधणीची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. देशपांडे यांना वरळीत पाठवून पक्षाचे नेते नितिन सरदेसाई व पक्षाचे उपाध्यक्ष व विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यावर दादर- माहिम विधानसभेच्या बांधणीची जबाबदारी आणखी मजबूत करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
 
 
आगामी मुंबईची सार्वत्रिक निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीच्या दृष्टकोनातून देशपांडे हे जामदार व बंटी म्हशीलकर व माजी नगरसेवक संतोष धुरी यांना सोबत घेऊन काम करतील. या मतदार संघात मनसेचा एक व उर्वरित सर्व नगरसेवक तत्कालीन शिवसेनेचे निवडुन आले होते. त्यातील मनसेचे दत्ता नरवणकर हे पुढे सेनेत आले होते. परंतु शिवसेनेची दोन छकले पडल्यानंतर ठाकरे सोबत असलेले समाधान सरवणकर,दत्ता नरवणकर, संतोष खरात हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत.
 
त्यामुळे या मतदार संघात भाजपची बाजू मजबूत नाही, तसेच शिवसेनाही तेवढी मजबूत नाही. पण त्या तुलनेत मनसेला अनुकूल वातावरण असल्याने या पक्षाने या मतदार संघात आपली बांधणी करण्यासाठी देशपांडे यांना वरळीत आणून आदित्य ठाकरे यांच्या पुढे आव्हान निर्माण करून ठाकरेंच्या गडाला भेदण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून देशपांडे यांना या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकूणच महापालिका व विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी  देशपांडे यांच्या नावाचा विचार झाला असून या मतदार संघाच्या  बांधणीच्या दृष्टीकोनातून शनिवारी बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी माजी आमदार आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कुठेतरी पक्षाने आता देशपांडे यांच्याकडे वरळी विधानसभेची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला यावर  जवळपास शिक्काम होता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.